मानवतेची महान सेवा — जीवनदान देणाऱ्या एम्ब्युलन्स सेवेचा भोकरमध्ये भव्य शुभारंभ नगराध्यक्ष दंडवे, तहसीलदार गुंडमवार यांच्या हस्ते उद्घाटन; नगरसेवक, पत्रकार व तालुका सेवा समितीची उपस्थिती

 


भोकर (प्रतिनिधी) — रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळून त्यांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीज यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गांवर सुरू असलेल्या मोफत ५४ एम्ब्युलन्स सेवेतील एक एम्ब्युलन्स भोकर तालुक्यासाठी उपलब्ध झाली असून तिचा भव्य शुभारंभ बुधवारी तहसील कार्यालयासमोर नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी नगरसेवक, पत्रकार व तालुका सेवा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष गंगाधर पडवळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेली ही एम्ब्युलन्स सेवा अपघातग्रस्त व गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार असून संकटकाळात तातडीची वैद्यकीय मदत पोहोचवून अनेकांना नवजीवन देणार आहे. त्यामुळे हा सोहळा समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात मानला जात आहे.

कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थानचे कार्य समाजासाठी अत्यंत अनमोल व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. संस्थेच्या उपक्रमांमुळे हजारो गरजू नागरिकांना मदत मिळत असून अशा समाजोपयोगी कार्याचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरसेवक राजेश्वर देशमुख यांनी रस्ते अपघातांमध्ये वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो, अशा परिस्थितीत संस्थेची मोफत रुग्णवाहिका सेवा अत्यंत उल्लेखनीय व पुण्यदायी असल्याचे सांगत संस्थेच्या कार्याला सलाम व्यक्त केला.

तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेसाठी सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थानचा उल्लेख केला. शासनाच्या पलीकडे जाऊन संस्था जे कार्य करत आहे, त्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

संपादक उत्तम बावळे यांनीही संस्थेच्या मोफत रुग्णवाहिका सेवेला जागतिक पातळीवरील आदर्श उपक्रम संबोधत सेवा समितीमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम समाजहिताचे असल्याचे सांगितले. भविष्यातही अशाच सेवाभावी कार्याची परंपरा कायम राहो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

डॉ. मनोज गिमेकर व डॉ. फेरोज इनामदार यांनी भोकर शहरासाठी ही रुग्णवाहिका अत्यंत गरजेची असल्याचे सांगत या सेवेचा शहर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. युवा नेते संदीप पाटील गौड यांनी संस्थेचे कौतुक करत मानवतेसाठी झटणारी संस्था म्हणून तिचा गौरव केला.

या कार्यक्रमामुळे भोकर व परिसरातील तीन ते चार तालुक्यांतील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेत मोठा दिलासा मिळणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यास ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

  यावेळी सर्व नगरसेवक, तालुकासेवासमिती, महिला, आजी माजी पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने