भोकर एक्सप्रेस प्रतिनिधी
भोकर : खरिप पेरणी हंगामाच्या लगबघीत काही बी-बियाणे व खत विक्रेत्यांनी शेतकरी बांधवांच्या आर्थिक अडचणी आणि अज्ञानाचा गैर फायदा घेत भेसळयुक्त बनावट खत विक्रीचा प्रयत्न सुरू केला असून अशा प्रकारचा १ लाख ८ हजार रुपये किमतीचा भेसळयुक्त बनावट खत मौ.बल्लाळ तांडा ता.भोकर येथे भोकर पोलीस व कृषि विभागाच्या संयुक्त पथकाने दि.७ जून रोजी पकडला आहे.या प्रकरणी ६ लाख रुपयाच्या टेम्पोसह उपरोक्त किमतीचा खत असे एकूण ७ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर बनावट बी-बियाणे व खत विक्रेत्यांच्या रॅकेट चा शिरकाव भोकर तालुक्यात झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे शेतकरी बांधवांनी सावधगिरी बाळगावी व बी-बियाणे,खतांची खात्री करुनच परवानाधारक विक्रेत्यांकडून तो पावतीनिशी खरेदी करावा आणि भविष्यात होणारे नुकसान तथा फसवणूक टाळावी,असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांनी केले आहे.
भोकर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सहा. पो.नि.शैलेंद्र औटे यांना दि.७ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली की,मौ.बल्लाळ तांडा ता.भोकर येथे भेसळयुक्त बनावट खत घेऊन एक चारचाकी वाहन येत आहे.त्यांनी ही माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,भोकर च्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील,भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके यांना दिली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. शैलेंद्र औटे,पो.उप.नि. दिलीप जाधव,जमादार बालाजी लक्षटवार,जमादार विष्णु खिल्लारे यांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. तसेच सहा.पो.नि.शैलेंद्र औटे यांनी ही माहिती तालुका कृषि अधिकारी दिलीप जाधव यांना देखील दिली. यावरुन दिलीप जाधव यांनी बोगस बी-बियाणे,खत खरेदी विक्रीवर आळा घालण्यासाठी कार्यरत केलेल्या पथकास ही माहिती दिली.त्यांच्या माहितीवरुन बालाजी मुंडे(तंत्र अधिकारी गुण नियंत्रण वि कृ स स कार्यालय लातूर विभाग),सचिन कपाळे(मोहीम अधिकारी,जि.प. नांदेड), अमोल पेकम(जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक,नांदेड), प्रमोद कद्रेकर(कृषी अधिकारी,गुणनियंत्रण,भोकर ),संदीप कोस्केवार (कृषि अधिकारी गु.नि. पंचायत समिती भोकर) यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहचले. सहा.पो.नि.शैलेंद्र औटे,पो.उप.नि.दिलीप जाधव व पोलीस कर्मचारी पथकाने रात्री ८:०० वाजताच्या दरम्यान मौ. बल्लाळ ता.भोकर येथे एम.एच.२६ बी.ई. ९४०७ क्रमांकाचा अशोक लिलँड कंपनीचा एक मालवाहू टेम्पो त्याबाबत घेतला.तसेच कृषि विभागाच्या उपरोक्त पथकाने त्या टेम्पो ची तपासणी केली असता त्यात एका नामवंत कंपनीचे लेबल असलेले एनपीके २०:२०:०:१३ या खताचे ६० पोती आढळून आले.परंतू त्या पोत्यातील खताची तपासणी केली असता त्यात भेसळयुक्त व बनावट खत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस पथकाने टेम्पो चालकाची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शितलसिंग चव्हाण(४५) रा.हनुमानगड,नांदेड असल्याचे सांगितले व सदरील खत भाग्यलक्ष्मी ॲग्रो बायोटेकचे मालक बालाजी करंडेकर यांच्या सांगण्यावरून येथे आणला असल्याचे सांगितले. उपस्थित कृषि विभाग पथकाने ही माहिती आपल्या वरीष्ठांना दिली.तसेच नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,नांदेड जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मेघना कावली,निवगुनि महाराष्ट्र राज्य चे संचालक सुनील बोरकर,लातूर विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर,मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रविण देशमुख,अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत,नांदेड जि.प.चे कृषी विकास अधिकारी नीलकुमार ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील टेम्पोतील भेसळयुक्त बनावट खतांचे नमुने घेतले व ते तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेत पाठविले. तसेच शेतकऱ्यांकडून फोन पे (PhonePe) द्वारे आगाऊ रक्कम घेऊन विना पावती ते खत विक्री करून शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ही यावेळी निष्पन्न झाले. यावरुन १ लाख ८ हजार रुपये किमतीचा हा भेसळयुक्त बनावट खत व ६ लाख रुपये किंमतीचा तो टेम्पो पोलीसांनी ताब्यात घेऊन एकूण ७ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.तसेच भोकर तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे गुणनियंत्रण अधिकारी प्रमोद कद्रेकर यांनी रितसर फिर्याद दिल्यावरुन भाग्यलक्ष्मी ॲग्रो बायोटेक, मुदखेड रोड भोकर चे मालक बालाजी माणिका करंडेकर व टेम्पो चालक शितलसिंग चव्हाण(४५)रा. हनुमानगड,नांदेड या दोघांविरुद्ध गु.र.नं.२८९/२०२६ कलम ३१८ (४),३(५) बीएनएस सहकलम रासायनिक खते (नियंत्रण)आदेश १९८५ : खंड १२,१३,१९,१९(ए), १९(बी),१९(सी),(i),१९ (सी)(ii),१९(सी)(iii),१९(सी (iv),२१(ए),२२(बी),३५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३(२)(ए),७(i)(ए)(ii) प्रमाणे भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पो.उप.नि.दिलीप जाधव हे करत आहेत. महत्वाचे म्हणजे ऐन खरीप पेरणी पुर्वी भोकर पोलीसांनी दाखविलेली कर्तव्य तत्परता व पोलीस आणि कृषि विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली असल्यामुळे शेतकरी बांधवांचे पुढील काळात होणारे नुकसान टळले असून सदरील कारवाईतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे. असे असले तरी तालुक्यात कार्यरत झालेल्या ‘त्या’ रॅकेट चा पर्दाफाश होणे अत्यावश्यक असून त्यातील कर्त्या करवित्यांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणे ही अत्यंत गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.